पावणेसहा झाले. बायोमेट्रिक मशीन जवळ गर्दी जमली होती. लाईनच लागली होती. त्याचा नंबर आल्यावर त्यानं thumb केला. (thumb करणे : बायोमेट्रिक मशीन वर उपस्थिती नोंदवणे) त्यानं निळा मिक्रोचेक्सचा शर्ट, काळी पॅन्ट आणि चॉकलेटी शूज (सगळं इंटरव्यूच्या वेळी विकत घेतलेलं) घातले होते. पाठीवर एका खांद्यात अडकवलेली सॅक लटकत होती. तो लिफ्टपाशी आला. तिथंही लोक लिफ्टची वाट बघत उभे होते. विनाफ्रेमचा चष्मा घातलेल्या मॅडम स्तब्ध एकटक लिफ्टच्या दाराच्या बाजूच्या आकड्यांकडं पाहत उभ्या होत्या. बाजूच्या पायऱ्यांवर दोघे उभे होते. त्यातला एकाने खाली उभ्या तिसऱ्याबद्दल काहीतरी बोलून दुसऱ्याला टाळी दिली. दोघ जोरात हसले. तिसरा आलेला राग लपवत त्याने चेष्टा कशी मनावर घेतली नाही हे दाखवण्यासाठी ओढून ताणून हसला. लिफ्टबघ्या मॅडमच्या पलीकडं एक मुलगी दुसरीची पर्स हातात घेऊन " कसली भारीय !" असा इर्षायूक्त भाव चेहऱ्यावर आणून दुसरीशी काहीतरी बोलत होती. दरम्यान लिफ्ट वर आली. आत कुणीच नव्हतं. लिफ्टबघ्या मॅडम पहिल्यांदा आत गेल्या. मग त्या दोघी आत गेल्या. मग तो आणि शेवटी तिघे आत गेले. त्याने लिफ्टचं दार बंद केलं. मॅडमनी ग्राऊंडफ्लोअरच बटन दाबलं. 3...2...1....0. लिफ्ट थांबली. "ग्राउंड फ्लोअर" लिफ्टमधील रेकॉर्डिंग वाजू लागली. त्यानं दार उघडलं आणि....
....समोर गडद अंधार होता, काहीच दिसत नव्हतं. दोन-तीन सेकंद तो तसाच बाहेर बघत राहिला आणि अचानक लिफ्टमधून चर्रर्रर्र.. आवाज आला अन लगेच काच फुटल्यासारखा आवाज झाला आणि लिफ्टमधील वीज गेली,आतसुद्धा अंधार झाला... एक किंचाळी, एक-दोन भीतीने गाराठलेले "आ..." असे आवाज, मग नुसता गोंधळ..हे सगळं चालू असतानाच एका मोबाईलचा टॉर्च पेटला, मग आणखी एकदोन पेटले आणि क्षणातच सगळे बरोबरच विझले. अनेक अस्ताव्यस्त आवाज-गोंधळ-एखादा किंचाळीवजा आवाज. पुढचे दहा पंधरा सेकंद असं चाललं. मग पायाखालची जमीन (लिफ्टचं फ्लोअर) सरकली आणि सगळे ७-८ सेकंदासाठी प्रचंड वेगाने खाली अंधारात पडल्यासारखे खेचले गेले, पडताना प्रचंड किंचाळ्या ऐकू आल्या आणि पुढच्या क्षणाला सगळं शांत झालं. फक्त गडद काळा दिशाहीन, मितीहीन अंधार. कुठलाही आवाज नाही, कसलाही आकार नाही, कसलाही स्पर्श नाही, की कसली जाणीव नाही. ३ स्त्रिया नव्हत्या, ४ पुरुष नव्हते, काहीच शिल्लक राहिल नाही, फक्त काळ्या रंगाशिवाय. तोही निघून जाऊ लागला आणि मग शिल्लक काहीच राहिलं नाही, अगदी अवर्णनीय, अनाकलनीय, अस्तित्वहीन झालं सगळं...,

No comments:
Post a Comment