Friday, 14 January 2022

किनशीचा चौक


 

#यादृच्छीक

#nostalgia

#native

#गाव

#nativism


" किनशीचा चौक"


मारुतीच्या देवळाफूडं त्यो माणूस बनेलवर उबा व्हता. त्यजी तब्येत लय जोरात हुती. सगळी माणसं त्यज्याकड बगत व्हती. मग त्यनं त्यज्याबरच्या पोराला बोलावलं अन त्यज्या हातातल्या पत्र्याच्या डब्यातन यक काचची बाटली काडली. डाव्या हाताव त्यातलं पाण्यासारक कायतरी घिऊन उजव्या हाताच्या बोटानं दाताला घासलं. मग त्यो देवळाफुडच्या पटांगणात आला. तित यका बारक्या ट्रॅकटरला दाव्यानी बांधलं हुतं. त्यानं मग दातात दावं धरलं. त्या दाव्याची दुनी टोकं ट्रॅकटरला बांधली व्हती. माणसं चाट हुन बघाय लागली. त्यो दातात दाव धरून, तोंड फूड करून आणि रग लावाय पाय माग जोरात जमिनीत रऊन चालाय लागला. त्यानं ट्रॅकटर चांगलाच फुड वडत न्हेला. मंग सगळ्या माणसांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवत यकमेकांबर कायतरी बोलत, कदी चेष्टा करत माणसं त्या ताकदवान माणसाकड बघ हुती. मग त्यज्यासोबतच्या पोऱ्या ती औषदाची बाटली घिऊन लोकांच्यात फिरू लागला. त्यो ताकदवान माणूस वरडू लागला.


 "बंदरछाप सुलोचन....दाताला लावा, माज्यासारक दात व्हत्याल....यकच नंबर...बंदरछाप सुलोचन...." 


माणसं नुसती बाटली हातात घ्यायची पण कुणी इकत घित नव्हतं. जर कुणी बघाय घितली तर जुडीदार त्यजी चेष्टा करायचं. मग बाटली घेणारा लाजून बाटली परत करायचा. 


ताकदवान माणूस ही सगळं बगत वरडत व्हता.


वडाप डायवर इजूदादांनी बाटली बघाय घितली. गावात पांढरा लेंगा- सदरा-गांदी टुपी अन नवी रंगीत कपडी ह्या दुनी कपड्यांच्या मदला प्रकार असणारी पांडरी पॅन्ट अन पांडरा शर्ट घालणारी सत्तरच्या दशकातली लोकं हुती. मजी रंगीत घायल्यासारकी लय फॅशन नको अन लय - मजी पाक लेंगा सदरा पण नको. दादा तसली मदली कपडी घालायचं. त्यांच्या शर्टची वरची दोन बटण निहमी उघडी असायची. दादा पांढऱ्या केसात यकदम कलप नको म्हणून म्हिनदी लावायचं. ती म्हिनदी निम्मी उडून वरनं थुडी तांबडी आणि आत पांढरी आशी दादांची केस दिसत व्हती. दादा देवळाच्या कट्ट्यावर बसलं हुतं.

 तर काय सांगत हुतु...हा!  डायवर दादांनी ती बाटली बघाय घितली तसा त्यो ताकदवान त्यांच्याकडं आला. त्यांनी दादांला बाटली उघडून दाताला लावून बघाय लावली. दादांनी बाटली उघडून त्यातलं सुलोचन डाव्या हातात घ्येतलं अन उजव्या बोटान दाताला लावलं. जस दादांनी ते सुलोचन दाताला लावलं तस तोंड लय बेकार कसनुस करून ते तोंडातलं सुलोचन थुकलं. तशी सगळी माणसं हासाय लागली. मग त्यो ताकदवान माणूस पण हासला अन मग त्यानं दादांना विचारलं.


"काय? कसं लागतंय?"


दादा, "लका लय की कडूय..."


मग ताकदवान म्हणाला, "व्हय कडू असणारच. कारण त्यात लय यगळी यगळी जडीबुटीय...त्यात कडुलिंब पणय...ही जडिबुटी हुडकून हुडकून गोळा किलीय... म्हणून म्हणतुय घ्या....परत तुमच्या गावात ईल का म्हायती नाय....फक्त पाच रूपायला बाटली....घ्या....माझ्यागत मजबूत दात व्हत्याल....बंदरछाप सुलोचन..."


त्यो ताकदवान असं म्हणल्यावर मग लय लोकांनी बाटली घितली. 



किनशीच्या चौकात आसली लय मानस ययची पयली. कायकाय करामती घिऊन ययची. पुण्याला जाणारा नवा स्टेट हायवे जसा किनशीतुन गेला तशी चौकाची मजाच गिली. 



इजूदादांची जमीन रस्त्यात गिली. त्यांला लै पैसा मिळाला. त्यांनी रस्त्याच्या बाजूला झालेल्या शॉपिंग सेंटरमदी यक गाळा घ्येतला. त्यात दादांनी बारका मॉलच टाकला.  त्यात दहा प्रकारचं ब्रशच हुतं - कोलगेट, पेपसोडेंट, ओरल बी, सेनसोडायन  आणि प्रत्येक ब्रँडच चार-पाच प्रकार. पेष्टा पण लय व्हत्या - कडुलिंबाची, आयुर्वेदिक, कोळशाची, मिठाची, पांढरी, रंगीत. दादा आता सगळी केसं कलप करायचं. त्यांनी त्यांच्या नातूला के टी यम गाडी घितली व्हती. नातूची केसं ह्या कानापसून ती त्या कानापर्यंत तासून कापलिली आणि वरची तशीच ठिवलीली हुती. त्यज्या गळ्यात सोन्याची चैन हुती. डोळ्यावर कायम त्रिकोणी-चौकोनी-षटकोनी आकाराचा आणि रंगीत काचंचा गॉगल असायचा. आप्रि आणि कुठतरी फाटल्याली जींची पॅन्ट आणि कडक पांढरा शर्ट नातू घालायचा. के टी यम गावात कुटतरी उभी करून दोस्तांकडून फोटू काढत नातू उबा असायचा. मग त्यो फोटो दोस्ताकडून ईडीट करून "somesh gome photography" आसं त्या फोटुत लिहून नातू "लडकी फिदा-भाऊंची हवा-attitude..." असल्या यमकजुळव्या वळी इंस्टाग्रामवर लिहायचा. अलीकडं नातू चालत चालत इतु आणि विडिओ शूटिंग कर्तु, त्यला गाणं चिकटावतू.... "ओ शेठ" वालं. नातू आताआता पुण्याच्या रस्त्याच्या बाजूच्या जिमनी इकणाऱ्या मॉन्टीदादाबर फिरत अस्तु. मॉन्टीदादा लय बेक्कार बेक्कार शिव्या दीतू. हाणामाऱ्या कर्तु. पोरांला लय आवाडतु त्यो. त्यजी वळक डायरेक साह्यबांबरय. मॉन्टीदादाच्या स्टेटसला त्यजे साह्यबांबरचे स्टेटस आस्त्यात.


किनशीत आता गरीब आन साद कुणीच ऱ्हाईलं नाय. संदयाकाळी  चौकात दुकानं बंद झाल्यावर पोरं वळीनं बसल्याली आस्त्यात शॉपिंग सेंटरच्या बाहेर कट्ट्यावर... मोबाईलमदी डोकी घालुन. मदीच कोणतरी हासतं मग हासल्याला बाकीच्यांना मोबाईल दाखवतू, मग सगळी हासत्यात, मग परत सगळी त्या अंधारात, तोंडात त्यो पांढरा उजेड मुरवत बसत्यात....तास-दोन तास-तीन तास. त्यतला यकादा पिल्लुबर बोलत लांब उबा आस्तुय, हातात काटी घिऊन उगच जमिनीवर रेघुट्या मारत. कुणाचा बड्डे आसल तर गाडीवर केक कापत्यात...हुशार पण आस्त्यात कायकाय.येलॉन मस्क - टेस्लावर गप्पा मार्त्यात....मग सगळी घरी जात्यात, आणि जिऊन...परत आडवं हुन ऱ्हायलेला उजेड तोंडावर मुरवत बसत्यात. पिल्लुवाली पिल्लुबर चॅटिंग करत्यात.


गावात आमच्यासारकी ऐंशी - नव्वदच्या दशकातलीपण आस्त्यात. ती पण मोबाईल बगत्यात. त्यांला के टी यम वाल्यांसारकी केसांची लय फॅशन नाय जमत, लैत लै सोल्जर कट आस्तुय. आणि पांढरा शर्ट वाले आणि आप्रि जीन्स वाले ह्यांच्या मदली कपडी आस्त्यात. जीन्स आणि टीशर्ट न्हायतर ऍपलकट शर्ट. मोबाईल तर ही पण बगत बसत्यात. पण ही इन्स्टाग्रामवर लै नासत्यात.ह्यांला फेसबुक आवडतंय अजून. ह्यांच्या गप्पात एकदातरी लक्ष्या-अशोक सराप, प्रियदर्शनचे पिच्चर, शाळा, हिमेश असले विषय यत्यात. 


त्या पोरांच्या पलीकडं मारुतीच्या कट्ट्यावर म्हूट्टी मानसपण बसत्यात. जिऊन निवांत तोंडात तंबाकू टाकून, मफलरी गुंडाळून गप्पा माराय बसत्यात ती. तीपण मोबाईल बघत्यात, युट्युबवरचं फेसबुकवरचं व्हाट्सअप्पवरचं व्हिडीओ बघत. मग कुठल्यातरी विषयावर गप्पा व्हत्याल. मग जशी रात्र हुईल तशा गप्पा चडत जात्यात. मग जुन्या आठवणी निगत्यात. लका तवा तसं हुतं. पयल असलं असायचं गावात. आपण आस केलं व्हतं. नकळत त्यांला बेकार वाटतं. पयल गाव नाय ऱ्हाईल राव. कदिकदी सगळ्यांलाच बेकार वाटतं. मग सगळी चौकागत गप बसत्यात. मग घरी जात्यात.


सगळी गेल्याव चौकात नुसत्या लायटी, रस्ता, झाडं नवी अन जुनी दुकानं ऱ्हात्यात. तवा जुन्या चौकाचा कुठंतरी आदिमदी शिल्लक ऱ्हायलेला म्हातारा भाग, लेंगा- सदरा- टुपी घातलेल्या माणसांची आठवण काढत बसलेला आस्तुय. ती लुंगी सदरा टुपी घालणारी चौकातली माणसं, ज्यांनी चौकात पयल्यांदा डांबर पडताना बगीतलं व्हतं. ज्यांच्या काळात गावात चुवीस तास लाईटपण नसायची. ज्यांनी चौकात लाईटचं खांब बसताना बघितल्यात. ज्यांच्या गप्पा शिती अन लयत लय राजकारण ह्यावर असायच्या. आदिमदी शिल्लक रस्त्यासारकी ती माणसं शिल्लक ऱ्हायली व्हती गावात. पांढऱ्या कपड्यांपासून ती इंस्टाग्रामवरल्या रंगीत फोटोपर्यंत आणि कडुलिंब ते बंदरछाप सुलोचन ते कोलगेटपर्यंत गाव लै  बदाललं व्हतं. 

 

© अभिजित कदम.

Thursday, 15 March 2018

हॉकिंग गेले तेव्हाची गोष्ट...

त्या दिवशी मी मरीन ड्राइव्हला येऊन बसलो होतो. बसल्यावर फेसबुक उघडलं, कुणीतरी news शेअर केली होती...

"Physicist Stephen Hawking passes away"

माझ्या डोळ्यांनी ती बातमी यांत्रिकपणे वाचली आणि मी मोबाईल लॉक करून खिशात ठेऊन दिला. मी शेवटचा मोबाईल तेव्हा वापरला होता. त्यामुळं मला ती स्पेसिफिक बातमी वाचल्याचं आठवतंय. माझ्या डोक्यात विचार घोंगावत होते....सॉरी मी पर्सनल सांगायला लागलो. पण आधी तुम्हाला त्यावेळी जगात काय चालू होतं ते सांगायचंय नाही का.

ओक्के. मी माझ्याबद्दल नंतर सांगतो, पहिल्यांदा त्यावेळी जगात काय चाललं होतं ते आठवेल तसं सांगतो.

सगळ्यात शेवटची महत्वाची बातमी आत्ता सांगितली तशी Stephen Hawking ची होती. माझा रुममेट एखाद्या दिवशी कुणा मोठ्या व्यक्तीचा जन्मदिवस वैगेरे असला की whatsapp ला त्या व्यक्तीचा फोटो स्टेटसला टाकायचा. म्हणजे तो UPSCचा अभ्यास करत होता, आणि त्याला सगळ्या गोष्टींबद्दल सगळं कसं माहिती आहे हे दाखवायची आवड होती, म्हणजे मला तर असं वाटायचं बर का. तर त्या दिवशी सकाळी उठल्यावर मी नेहमीप्रमाणं whatsapp वर सगळ्यांचे स्टेटस पाहत होतो, तेव्हा त्याने Einstein चा टाकलेला फोटो पहिला. मी त्याला विचारल्यावर त्यानं सांगितलेलं की आज Einstein चा वाढदिवस आहे. आणि आपण रोहित शेट्टीचा फॅन होतो, म्हणजे आहे. आपल्याला त्याच्या पिक्चरमध्ये हवेत उडवलेल्या गाड्या जाम entertainig वाटतात. तेव्हा whatsapp पाहून झाल्यावर फेसबुक बघताना रोहित शेट्टीच्या फॅन पेजवर त्याचा बड्डे असल्याचं कळालं. आणि नंतर आमिर खानचा बड्डे असल्याचंही कळालं, लक्षात राहिलं, कारण मी माझ्या whatsapp स्टेटसला आमिरचा आणि रोहित शेट्टीच्या बड्डेचे स्टेटस टाकले होते.

हे सगळं सांगितलं कारण त्या दिवसात याच गोष्टी मी फेसबुक-whatsapp वर पहिल्या होत्या, त्या लक्षात राहिल्या. आणि आता हे सांगताना अचानक आठवलं की त्या दिवसाच्या साधारण एक आठवड्यापूर्वी वैगेरे श्रीदेवीपण Rest in Peace झालेली..... मला आवडायची, म्हणजे माधुरीनंतर तीच आवडायची.
आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, आमच्या रुममेटला स्मिता पाटील आवडते.

तर हॉकिंग गेला त्या दिवसाच्या आदल्या दिवशी मुंबईत आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. लाल झेंडे घेऊन मोठ्या संख्येने ते शेतकरी मुंबईत आले होते.
माझ्या त्या रुममेटने सांगितलं त्याप्रमाणं त्या आदिवासींना ते कसत असलेल्या जमिनी आपल्या नावावर करता येत नव्हत्या. तसा कायदा वैगेरे पास झाला होता तरी ते कसत असलेल्या जमिनींवरील हक्क त्यांना मिळाले नव्हते. मोर्चातली ही मुख्य मागणी होती. त्या रुममेटला...त्याला आम्ही KD म्हणायचो. आम्ही म्हणजे आम्ही तिघ राहत होतो. तो SIAC ला होता.....
व सॉरी मी परत पर्सनल सांगू लागलो. तर सांगायचं काय होतं की KD ला बऱ्यापैकी नॉलेज होत बर का...तसा सांगायचा तो बरीच माहिती, सगळं कळल्यावर चांगलं वाटायचं...पण तरी मला त्याचा उगाच राग यायचा. तो दिखाऊ आहे असं माझं मत झालं होतं.

हा, तर तो मोर्चा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायचं आश्वासन दिल्याचं KD न मला सांगितलेलं मला आठवतंय. जगाबद्दल सांगायचं झालं तर KD आणि त्याचा मित्र डोन्या...त्याच नाव माहिती नाय, पण तो मित्र आला की KD आणि तो ट्रम्प-अमेरिका-रशिया-कोरिया-अंटार्क्टिका ते मोदी आणि पुन्हा ट्रम्प अशा ढीगभर विषयावर बोलायचे...तो आला की एकदातरी ट्रम्पला शिव्या द्यायचा...त्यामुळं आम्ही म्हणजे KD सोडून आम्ही दोघा रुममेटनी त्याच नाव डोन्या ठेवलं होतं. हा तर काय सांगत होतो की KD आणि डोन्या जगाबद्दल बोलायचे सारखे. ग्लोबल वॉर्मिंग का क्लायमेट चेंज कमी करण्यासाठी पॅरिसला कसला करार झाला होता. त्यातून डोनाल्ड ट्रम्पमुळं अमेरिका बाहेर पडलेली. आणि अमेरिका दरवेळीच कशी ढोंगीपणा करते याबद्दल KD तावातावानं सांगायचा. KD कडून ऐकलेल्या गोष्टीच सांगू शकतो मी जगाबद्दल.
आणि हो नॉर्थ कोरियान nuclear test केली होती बहुतेक आणि अमेरिकेनं साऊथ कोरियात त्यांची मिसाईल सोडायचा बेस वैगेरे तयार केला होता असंही KD बोलला होता.

KD आणि डोन्या असो किंवा आणखी कुणीही असो, भारतातल्या politics वर बोलायला लागले की मला जाम उदास वाटायचं. विषय एकच असायचा, त्या विषयाभोवतीच चर्चा फिरायची. तो विषय म्हणजे मोदी. आणि चर्चा करणारे सगळे तीन गटात विभागलेले होते, एक गट म्हणायचा मोदींसारखा ग्रेट माणूस नाही. दुसरा गट म्हणायचा मोदीसारखा वाईट माणूस नाही. तिसरा गट माझ्यासारख्यांचा होता. बोअर माणसांचा. फेसबुक, व्हाट्सप्प, पेपर आणि मित्रांच्या चर्चा...सगळीकडच्या चर्चा कुठंही सुरू झाल्या की याच विषयाला येऊन मिळायच्या आणि मग याच विषयाच्या बाजूने आणि विरुद्ध बोलणाऱ्यांच्यात मवाळ ते जहाल चर्चा व्हायच्या. आणि कधीकधी विषय इतका पेटायचा की एकमेकांची पर्सनल उनीधुनी काढली जायची....कधी कधी मजा यायची, पण बऱ्याचदा उदास व्हायचं. असल्या चर्चा सुरू झाल्या की मी मोबाईल काढून एलियन शूटर खेळत बसायचो. त्यामुळं भारताच्या politics बद्दल मी काही सांगू शकत नाही कारण मला आणखी उदास वाटेल....
जाऊदे तो विषय...

त्यावेळच्या जगाबद्दल...हा त्यावेळी मोबाईलचा वापर प्रचंड वाढला होता. म्हणजे मोबाईलशिवाय जगण अशक्यच झालं होतं. सकाळी मोबाईलच्या अलार्म ऐकून जाग येत होती आणि रात्री फेसबुक-व्हाट्सअप्प-युट्युब बघत झोप लागत होती. म्हणजे आमच्या रूमवर साधारण संध्याकाळी आम्ही तिघ नावाला एकत्र राहायचो, तिघांच बोलणं खूप कमी असायचं. तिघंही मोबाईल पाहत बसलेलो असायचो, काही काम नसलं तर. मेसवाल्याचा डबा यायचा, मग जेवतानाही बऱ्याचदा तिघ मोबाईल पाहत जेवायचो. आणि जर डबा नाही आला तर आम्ही ऑनलाईन ऑर्डर मागवायचो. आमच्या दुसऱ्या रुममेटचा मुलगी पाहायचा कार्यक्रम सुरू झाला होता, तर मुलींचे फोटो आणि बायोडाटा त्याला व्हाट्सअप्पवर यायचे. तो कोल्हापूरचा होता, सारखं मुली पाहायला जाणं त्याला शक्य नव्हतं म्हणून तो व्हाट्सअपवर फोटो आणि बायोडाटा मागवायचा. मग त्याला एखादी आवडली तर आम्ही दोघे तिची माहिती फेसबुकवरून काढायचो. KD आम्हाला असलं करताना बघून आम्हाला शिव्या घालायचा...त्याला हे चिप वाटायचं. आम्हाला हा चिप म्हणायचा...यानं मात्र त्याच्या गर्लफ्रेंडच्या अकाउंटची डिटेक्टिव्हगिरी करायचा. म्हणजे एकदा आमच्या समोर फोनवरून तिला "त्याच्याशी का बोलतेय अजून फेसबुकवर....हो मी वाचले तुझे मेसेज, पण तू अजून का बोलतेय त्याच्याशी" असलं जोरात ओरडतात ऐकलं होतं. साला हापण ढोंगीच होता....

सॉरी, लय भरकटलो. तर सांगायचं काय तर मोबाईल म्हणजे खूप महत्वचा झाला होता.

आणखी काय सांगू....
हा जगाबद्दल विचारतोय म्हणून सांगतो बर का,
डी सी कॉमिक चा जस्टीस लीग आला होता आणि मार्व्हल चा इन्फिनिटी वॉर अजून यायचा होता. म्हणजे मी जस्टीस लीग पहिला नव्हता, आपल्याला मार्व्हल आणि avengers जास्ती आवडतात. सगळ्यात जास्ती आयर्न मॅन....रॉबर्ट.
आणि आमिरचा ठग्स ऑफ हिंदोस्तान अजून यायचा होता....
हो...पद्मवतीच्या वेळी खूप दंगा झाला होता...

डोकं दुखायला लागलंय ओ.
अचानक...
आता बास करतो जगाबद्दल...
माझं थोडं सांगतो....

....डोकं जड व्हायला लागलंय...

हा,
म्हणजे मी कंपनीत resign चं इंटिमेशन HR ला देऊन त्यादिवशी मरिन ड्राइव्हला आलो होतो. मघाशी सांगितलं तसं डोक्यात विचार घोंगावत होते. कंपनीत एक दिवस सुद्धा राहायची इच्छा नव्हती. पिळून काढत होते साले. गेल्याच आठवड्यात बॉसशी जोरात भांडण झालं, आणि ठरवलं तस आज इंटिमेशन देऊन आलो. जरा मोकळं वाटंत होतं, पण टेन्शन जास्त आलं होतं.

मला मरीन ड्राइव्हनंतरच काही आठवेना...
अरे काहीच आठवेना...

मी इथं कसा आलो?
मी कुठं आहे?


आ....
माझं डोकं दुखू लागलंय जोरात....
जड होऊ लागलंय...

माझे डोळे पण दुखायला लागलेत...
काय होतंय मला?

तुम्ही....

अरे !!

अरे तुम्ही कोण आहात?
मी इतका वेळ काय बडबडत होतो??

आणि...ब्लर कसे दिसताय सगळे?

तुमच्या माग...त्या वायरी तर स्पष्ट दिसताहेत...

तुम्ही सगळे......तुम्ही .....होलोग्राम!

आ .....
डोकं फुटायला झालंय....

मी कुठं आहे?
.
.
.
....माझं डोकं....

~end~


_________________________________________________________

Inspiration :
• Hawking expressed concern that life on Earth is at risk from a sudden nuclear war, a genetically engineered virus, global warming, or other dangers humans have not yet thought of. (Ref : wikipedia, NYT, The Daily Telegraph)

• Hawking stated that, given the vastness of the universe, aliens likely exist, but that contact with them should be avoided. He warned that aliens might pillage Earth for resources. In 2010 he said, "If aliens visit us, the outcome would be much as when Columbus landed in America, which didn't turn out well for the Native Americans." (Ref : wikipedia, NYT, The Daily Telegraph)

• Hawking warned that superintelligent artificial intelligence could be pivotal in steering humanity's fate, stating that "the potential benefits are huge... Success in creating AI would be the biggest event in human history. It might also be the last, unless we learn how to avoid the risks." (Ref : wikipedia, The Independent, BBC News)

• Hawking feared Donald Trump's policies on global warming could endanger the planet and make global warming irreversible. Hawking said, "Climate change is one of the great dangers we face, and it's one we can prevent if we act now. By denying the evidence for climate change, and pulling out of the Paris Climate Agreement, Donald Trump will cause avoidable environmental damage to our beautiful planet, endangering the natural world, for us and our children." Hawking further stated that this could lead Earth "to become like Venus, with a temperature of two hundred and fifty degrees, and raining sulphuric acid". (Ref : Wikipedia, BBC News,The Independent)

• And this one :
In 2006 Hawking posed an open question on the Internet: "In a world that is in chaos politically, socially and environmentally, how can the human race sustain another 100 years?", later clarifying: "I don't know the answer. That is why I asked the question, to get people to think about it, and to be aware of the dangers we now face."

(Ref : Wikipedia, The Guardian)


Thursday, 4 January 2018

कुणी आहे का?






पावसाळ्याचे दिवस होते, बाहेरच्या ढगांमुळं आणि होस्टेलच्या मूळच्याच कोंदटपणामुळं रूममध्ये अंधार झाला होता, म्हणून त्यानं रुममधला बल्ब लावला होता. बल्बचा पिवळट पांढरा प्रकाश रूममध्ये साचला होता. चारजण दाटीवाटीनं झोपू शकतील एवढी ती रुम दोघांसाठी दिलेली होती. झोपल्यावर पायाखाली अर्धा माणूस जागा मोकळी राहील इतकी लांब होती खोली. एक दार, एक खिडकी होती. खिडकीला लहान आरसा बांधला होता. खिडकीत पॅराशूटची छोटी बॉटल आणि झटॅकचा लहान डबा होता. एक कंगवा होता. रूमच्या भिंतीतच कपाट होतं. त्याचं एक दार मोडलेलं होतं. आत दोन कप्प्यात पुस्तकं आणि वह्या अस्ताव्यस्त कोंबलेल्या होत्या. खालच्या कप्प्यात बॅगा होत्या, स्टीलचा रिकामा डबा होता. त्यातले चिवडा-लाडू आणल्या दिवशीच संपले होते. रुमचं दार उघडं होतं. दाराजवळ झाडू होता, सुपली होती, ३ चपला, एक स्पोर्ट शु, एक dms होता. दाराच्या विरुद्ध कोपऱ्यात टेबलखाली लोकसत्ताचा ढीग पडला होता. ढिगाशेजारी एक प्लॅस्टिकची बादली आणि त्यात अर्धी कापलेली पाण्याची बॉटल होती. टेबलवर हिटर पडला होता. टेबलच्यावर भिंतीवर गर्दीन कपडे अडकवलेले होते. कपाटाच्या विरुद्ध भिंतीवर करीनाचा, कतरिनाचा पेपरमधला कोरून कापलेला फोटो चिटकवलेला होता. तिथून थोड्या अंतरावर "आत्मविश्वासाची शक्ती" असं हेडिंग असलेला पेपरमधला लेख अर्धवट फाटलेल्या अवस्थेत चिटकवला होता. फिकट पिवळ्या रंगाच्या त्या भिंतीवर एवढया तीन स्पष्ट गोष्टी सोडल्या तर अशा बऱ्याच चिकटवलेल्या गोष्टी फाडून टाकल्याचे दर्शवणारे कोरे चौकोन होते, ज्यातून भिंतीचा जुना निळा रंग दिसत होता. खाली दोन गाद्या टाकलेल्या होत्या, बहुतेक एक-दोन आठवड्यापासून त्या तशाच अंथरलेल्या असाव्या.

दुपारी कॉलेज बुडवून तो manual आणि assignments लिहीत त्या गादीवर बसला होता. Assignments लिहून झाले होते. तो Manual मधल्या diagrams काढत होता. समोर एक manual उघडलेलं होतं. त्यात बघून बोथट टोक झालेल्या पेन्सिलन तो उभ्या आडव्या रेषा मारत diagram काढत होता. जीन्स आणि टीशर्ट घालूनच तो completion करत बसला होता. सबमिशनचा शेवटचा दिवस होता, आणि soil science चं सबमिशन केलं नाही तर इंटर्नल मार्क्स अजिबात मिळत नाहीत हे कॉलेजजाहीर होतं. पाचपर्यंत सर केबिनमध्ये असतात, नंतर घरी जातात.

त्याने घड्याळात पाहिलं. पावणेपाच झाले होते. त्याने शेवटची diagram पटकन काढली. नाव द्यायची राहिली होती, त्याने तसच manual बंद करून हातात घेतलं. पेन्सिल,पेन खिशात कोंबल. दुसरं manual कपाटात टाकलं. Assignment घेतली आणि उठून दारात आला. पायात सँडल चढवले आणि लॉबीतून पळतच होस्टेलच्या बाहेर आला. बाहेर ढग दाटून आल्यामुळं अंधार दाटला होता. लवकरच पाऊस पडेल अस वातावरण झालं होतं. हॉस्टेलपासून soil science department चालत दहा मिनिटाच्या अंतरावर होतं, पण पावसामुळं सर लवकर जाण्याची शक्यता वाटल्यामुळ तो पळतच निघाला. त्याला रस्त्यात कुणीतरी हाक मारली, पण तो तिकडं न बघता तसाच पळत गेला. रिमझिम पाऊस सुरू झाला. तो पळतच soil department समोर येऊन थांबला. जरा वेळ मोठ्याने श्वास घेत गुडघ्यावर हात टेकवून झुकून उभा राहिला. बारीक पाऊस पडत होता, पण तो मोठ्या चिंचेच्या झाडाखाली उभा होता, इतका भिजत नव्हता. त्याच्या समोर गेटच्या पलीकडं ती soil डिपार्टमेंट ची भव्य, सुंदर, दगडी इमारत पावसात भिजत उभी होती. इंग्रजांनी बांधलेली ती इमारत म्हणे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रेडक्रॉसने जखमी लोकांच्या उपचारासाठी तात्पुरती वापरली होती. इंग्रजांच्या उत्कृष्ट बांधकामाचा नमुना असलेली ती इमारत त्याच्यासमोर उभी होती. त्याचा श्वास आता संथ झाला.

तो गेटमधून आत गेला. मग पायऱ्या चढून व्हरांड्यात आला. इमारतीच्या दोन्ही बाजूनी बाहेरून बुरुजासारखा दिसणारा मनोरेवजा गोल जिना होता. त्या जिन्यावरून वर जाताना गोल फिरत जावं लागायचं. वर जाताना नागमोडी वळण घेणाऱ्या दगडी पायऱ्या आणि बाजूला दगडी भिंती होत्या. पायऱ्या चढताना वरून खाली कोण उतरतय किंवा खालून वर आपल्या मागून कोण येतंय कळत नसायचं. सरांची केबिन वरच्या मजल्यावर होती. जिना पटपट चढत त्यानं घड्याळ पाहिलं-पाच वाजतच आल्या होत्या. पाच वाजण्याच्या सुमार असला तरी सगळं चिडीचूप होतं. पाऊस आता वाढला होता, जोरात आवाज येऊ लागला. तो पटपट जिना चढताना त्याला त्याच्याच पावलांचा आवाज येत होता. तो वर पोहोचला, पळतच सरांच्या केबिनमध्ये घुसला. सर टेबलवरची पुस्तकं गोळा करत होते. कुणीतरी आल्याच लक्षात येऊन त्यांनी चष्म्यातून त्याच्याकडं पाहिलं, मग हातानं खून करून काय असं विचारल आणि हातातली पुस्तकं बाजूच्या कपाटात ठेवली.

तो बोलला , "सर.....सबमिशन..."

सरांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. सर बोलले, "लवकर आलास..."

मग जरा त्रासून लगेच म्हणाले, " आणा इकडं"

त्यानं assignment चे ताव आणि manual सरांकडं दिलं. सरांनी त्याच्याकडं वैतागून पाहिलं आणि तो गठ्ठा कपाटात ठेवला.

तो थँक्स बोलून गॅलरीत आला. निश्वास सोडला. मग जिन्याकडं चालत निघाला. मागं कुलुप लावल्याचा आवाज आला. त्यानं मागं वळून पाहिलं, सर कुलूप लावून तो चाललेल्या जिन्याच्या विरुद्ध जिन्याकडं निघाले. वरच्या मजल्यावर फक्त सरांचीच केबिन उघडी होती. आता तीपण बंद झाली. सरांच्या एका हातात हँडबॅग होती. तो थांबला. सर जाईपर्यंत थांबला. सर जिन्यातून दिसेनासे झाले. सर गेल्यावर त्या गॅलरीत तो एकटाच राहिला. बाहेर जोरात पाऊस पडतच होता. तो गॅलरीत उभा राहून खाली पाहू लागला. खाली सर पळत त्यांच्या कारजवळ गेले, आणि दार उघडून आत बसले. कारची लाईट लागली, त्या प्रकाशात जोरात पडणाऱ्या पावसाच्या तिरकस रेषा दिसत होत्या. सरांची गाडी गेली. तो तसाच पाऊस बघत थांबला. मग पुन्हा जिन्याकडं जायला वळाला आणि जागेवरच थबकला. त्याचे डोळे भीतीयुक्त आश्चर्याने विस्फारले. तो ज्या जिन्याकडं निघाला होता त्या जिन्यात एक उंच धिप्पाड आकृती उभी आल्यासारखी त्याला अस्पष्ट दिसली. त्याचा घसा कोरडा पडला. तो सर खाली गेले त्या जिन्याकडं जायला वळला आणि पळतच जिन्याकडं गेला. जिन्यात जाण्याआधी त्यानं माग पाहिलं तर कुणीच नव्हतं. तो थांबला. तिथं कुलर होता. तसल्या पावसात त्याला तहान लागली होती. त्यानं त्या जिन्याकडं पाहतच पटकन ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि गटगट पिऊन टाकलं. ग्लास ठेऊन तो जिन्यातून खाली पळत निघाला. त्याच्या अंगावर काटा आला होता. पळता पळता पायरीचा अंदाज चुकून तो पडला. भिंतीवर डोकं आपटलं. जोरात लागलं. डोळे उघडले, समोर पुन्हा ती आकृती अस्पष्ट दिसली. त्याच्या एकदम समोरच होती. त्याचे डोळे मिटले.

त्याने डोळे उघडले आणि उजेडामुळं लगेच झाकले. मग डोळ्यासमोर हात धरून अर्धवट उघडले. हात बाजूला सारला. डोळ्यासमोर झाडाच्या फांद्यातून सूर्याची किरणं डोळ्यावर येत होती. तो जमिनीवर झोपला होता. मग तो उठून बसला. तो soil science department च्या समोर होता. तो उठला. डोकं प्रचंड दुखत असल्याचं त्याला जाणवलं. दुपार झाली होती. सगळीकडं ऊन पडलं होतं. तो आजूबाजूला पाहू लागला. इमारत, तिच्यासमोरच गेट, गेटबाहेर रस्ता सगळं होतं. पण कुणीच माणूस दिसत नव्हतं. त्यानं घड्याळ पाहिलं. घड्याळ फुटलं होतं. त्याला काही समजेना. डोकं दुखतच होत. तो गेटमधून बाहेर रस्त्यावर आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ते संपेपर्यंत पाहिलं. कुणीच माणूस दिसत नव्हता. तो पळत जवळच असलेल्या कॉलेजच्या मेन बिल्डिंगकड गेला. तिथंही कुणीच नव्हतं. त्यानं क्लासरूम्समध्ये डोकावून पाहिलं. आत कुणीच नव्हतं. त्याला काहीच समजेनास झालं. डोकं दुखतच होतं. तो मेन बिल्डिंगच्या समोरच्या लॉनमध्ये आला. गोल फिरून सगळीकडं नीट पाहिलं. कुठंच कुणीच माणूस नव्हतं. त्यानं मेन बिल्डिंगच्या डोमच्या बरोबर खाली असलेल्या मोठ्या घड्याळात पाहिलं. त्या घड्याळात काटेच नव्हते! सगळा कॉलेजचा कॅम्पस सुन्न होता. तो ग्राउंडवर गेला, मग कँटीनमध्ये, मग स्टोर्समध्ये... एकही माणूस दिसला नाही. तो होस्टेलकडं पळत गेला. हॉस्टेलपर्यंतच्या रस्त्यातही कुणीच दिसलं नाही.
हॉस्टेलबाहेरही नाही. तो पळत आत गेला. आत पहिल्या रूममध्ये शिरला, आत कुणी नव्हतं. मग अजून ४-५ रूममध्ये जाऊन पाहिलं. कुणीच नव्हतं. तो लॉबीत आला आणि जोरात ओरडला....

"कुणी आहे का???????????"

त्याला त्याचाच आवाज परत ऐकू आला. मग शांत. कॉमन बाथरूममधून पाण्याचे ठिपके पडण्याचा आवाज येत होता फक्त.

टप... टप... टप...


- अभिजीत.

#random
#यादृच्छीक

abhi0118/04



Wednesday, 27 December 2017

लिंकनंतर


*लिंकनंतर*



#random
#यादृच्छीक

त्यानं खाडकन फोन आपटला. पुन्हा एकदा मार्केटिंग करताना पलीकडून शिव्या खाव्या लागल्या होत्या. कितीही आदरपूर्वक बोला, एकतर पॉलिसीच नाव ऐकलं तरी फोन कट करतात लोक, कधी not interested तर आत्ता मिळाली तशी शिवी मिळते कधी कधी. तो मनातच एकदोन शिव्या हासडत विचार करत बसला. त्याला वैताग आला होता,पण तीनदा आधीचे जॉब सोडून बऱ्याच दिवसांनी कसंतरी हे काम मिळालं होतं. पर्याय नव्हता. डोक्याला हात लावून जरावेळ खुर्चीत तसाच बसून राहिला. मग खुर्चीत मागं रेलून बसला, हात डोक्यामागं बांधून सिलिंग फॅनकडं पाहत राहिला. मग भिंतीवरील घड्याळाकडं पाहिलं अकरा वाजले होते. कपाळावर मघापासून आठयांच पसरलेलं जाळं तसंच होतं. जरावेळान त्यानं टेबलावरील मोबाईल घेतला. Whatsapp चे मेसेजेस अनरीड करत बसला, पण वाचत नव्हता. फक्त इनबॉक्स clear केलं. मग फेसबुकवर स्क्रोल करत राहिला. फक्त डोळे त्या स्क्रीनवर होते. त्याच्या डोक्यात अजून मघाचा कॉल घुमत होता बहुतेक, कारण नेहमी ज्या पेजच्या प्रत्येक मिम्सच्या पोस्टवर एकटाच गालात किंवा जोरात हसणारा तो आज त्या पेजचे 3 मिम्स पाहूनही हसला नव्हता. कपाळावरील आठ्या तशाच होत्या. शेवटी त्यानं वैतागून मोबाईल परत टेबलवर ठेवून दिला. टेबलावरील फोनकडं एकदा पाहिलं.

"क्रिकेटर होणार...? ख्या ख्या ख्या"

बारावीत वर्गात गेस्टनी काय होणार या प्रश्नावर यानं दिलेल्या "क्रिकेटर" या उत्तरावर तो गेस्ट अस बोलून जोरात हसला होता, त्याच्या मागं वर्गातली मुलं आणि त्याचे सरसुद्धा हसले होते. त्याला अचानक तो प्रसंग आठवला. मनात एक शिवी हसडली. कपाळावर आठ्या तशाच होत्या. तो खुर्चीत डोक्यामाग हात बांधून रेलून बसला आणि पुन्हा सिलिंग फॅनकडं पाहत राहिला. Whatsapp च्या मेसेजच्या एकदम 5-6 नोटिफिक्शन्स वाजल्या. त्यानं मोबाईल हातात घेतला आणि मेसेज पाहू लागला. " KINGS 2014" ग्रुपवर कुणीतरी कसल्यातरी accident चे 5-6 फोटो टाकले होते आणि वर काहीतरी लिहिलं होतं. वैतागान तो होम्सक्रीनच बटन दाबणार इतक्यात आणखी एक मेसेज आला.

मनःशांती हवीय?
खालील लिंकवर क्लिक करा.

आणि पुढच्याच क्षणी मेसेज आला,

pls ignore, sent by mistake.

त्यानं त्या लिंकवर बोट टेकवलं.

***

भिंतीवरील घड्याळात सव्वाचार वाजले होते.
त्याच्या टेबलजवळ खूप लोक जमले होते. कुणी त्याचं तोंड हलवून पाहत होतं, 2-3 जणं त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते.पण तो गप्पच, नुसता बघत होता सगळ्यांकड. त्याच्या तोंडावर दोनदा पाणी मारलं होतं, त्यामुळं त्याच तोंड भिजल होतं. त्याच्या भोवतीच्या गर्दीच्या मागं घोळक्यात दबकी चर्चा चालू होती, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. तो फक्त सगळ्यांकड पाहत होता. त्याच्या कपाळावर आठ्या नव्हत्या किंवा चेहऱ्यावर कसलाच भाव नव्हता. तो कोऱ्या चेहऱ्याने सगळ्यांकड फक्त पहात होता. त्याचा श्वास चालू होता. कुणीतरी त्याच्या गालात हलकी चापट मारली, तर तो त्याच शून्य चेहऱ्याने त्याच्याकडं पाहू लागला. श्वास त्याच संथ गतीनं चालू होता. त्याच्यासमोर त्या गर्दीचा खूप गोंगाट चालू होता. तो त्याच नजरेनं सगळ्यांकड पहात खुर्चीत बसलेला होता. त्याचे दोन्ही हात टेबलवर पसरलेले होते. त्या गडबडीत त्याचा मोबाईल टेबलवरून खाली पडलेला होता.


- अभिजीत.

Wednesday, 13 December 2017

लिफ्टखाली काहीच नाही.



पावणेसहा झाले. बायोमेट्रिक मशीन जवळ गर्दी जमली होती. लाईनच लागली होती. त्याचा नंबर आल्यावर त्यानं thumb केला. (thumb करणे : बायोमेट्रिक मशीन वर उपस्थिती नोंदवणे) त्यानं निळा मिक्रोचेक्सचा शर्ट, काळी पॅन्ट आणि चॉकलेटी शूज (सगळं इंटरव्यूच्या वेळी विकत घेतलेलं) घातले होते. पाठीवर एका खांद्यात अडकवलेली सॅक लटकत होती. तो लिफ्टपाशी आला. तिथंही लोक लिफ्टची वाट बघत उभे होते. विनाफ्रेमचा चष्मा घातलेल्या मॅडम स्तब्ध एकटक लिफ्टच्या दाराच्या बाजूच्या आकड्यांकडं पाहत उभ्या होत्या. बाजूच्या पायऱ्यांवर दोघे उभे होते. त्यातला एकाने खाली उभ्या तिसऱ्याबद्दल काहीतरी बोलून दुसऱ्याला टाळी दिली. दोघ जोरात हसले. तिसरा आलेला राग लपवत त्याने चेष्टा कशी मनावर घेतली नाही हे दाखवण्यासाठी ओढून ताणून हसला. लिफ्टबघ्या मॅडमच्या पलीकडं एक मुलगी दुसरीची पर्स हातात घेऊन " कसली भारीय !" असा इर्षायूक्त भाव चेहऱ्यावर आणून दुसरीशी काहीतरी बोलत होती. दरम्यान लिफ्ट वर आली. आत कुणीच नव्हतं. लिफ्टबघ्या मॅडम पहिल्यांदा आत गेल्या. मग त्या दोघी आत गेल्या. मग तो आणि शेवटी तिघे आत गेले. त्याने लिफ्टचं दार बंद केलं. मॅडमनी ग्राऊंडफ्लोअरच बटन दाबलं. 3...2...1....0. लिफ्ट थांबली. "ग्राउंड फ्लोअर" लिफ्टमधील रेकॉर्डिंग वाजू लागली. त्यानं दार उघडलं आणि....

....समोर गडद अंधार होता, काहीच दिसत नव्हतं. दोन-तीन सेकंद तो तसाच बाहेर बघत राहिला आणि अचानक लिफ्टमधून चर्रर्रर्र.. आवाज आला अन लगेच काच फुटल्यासारखा आवाज झाला आणि लिफ्टमधील वीज गेली,आतसुद्धा अंधार झाला... एक किंचाळी, एक-दोन भीतीने गाराठलेले "आ..." असे आवाज, मग नुसता गोंधळ..हे सगळं चालू असतानाच एका मोबाईलचा टॉर्च पेटला, मग आणखी एकदोन पेटले आणि क्षणातच सगळे बरोबरच विझले. अनेक अस्ताव्यस्त आवाज-गोंधळ-एखादा किंचाळीवजा आवाज. पुढचे दहा पंधरा सेकंद असं चाललं. मग पायाखालची जमीन (लिफ्टचं फ्लोअर) सरकली आणि सगळे ७-८ सेकंदासाठी प्रचंड वेगाने खाली अंधारात पडल्यासारखे खेचले गेले, पडताना प्रचंड किंचाळ्या ऐकू आल्या आणि पुढच्या क्षणाला सगळं शांत झालं. फक्त गडद काळा दिशाहीन, मितीहीन अंधार. कुठलाही आवाज नाही, कसलाही आकार नाही, कसलाही स्पर्श नाही, की कसली जाणीव नाही. ३ स्त्रिया नव्हत्या, ४ पुरुष नव्हते, काहीच शिल्लक राहिल नाही, फक्त काळ्या रंगाशिवाय. तोही निघून जाऊ लागला आणि मग शिल्लक काहीच राहिलं नाही, अगदी अवर्णनीय, अनाकलनीय, अस्तित्वहीन झालं सगळं...,

साळुंखी संध्याकाळी...






                     

१.शेवटचा तास..

शेवटचा तास होता. पोरांना ओरडून ओरडून सरांनी गप्प बसवलं होतं. सर खुर्चीत पाय लांब पसरून रेलून निवांत पेनने कान टोकरत बसले होते. ते कान टोकरनं त्यांना अत्यंत सुखावह वाटत असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर पसरले होते. त्यांचे डोळे या प्रक्रियेच्या आनंदामुळे मिटले गेले होते. पहिल्या बकवरची पोर शांत असतात असं पूर्वी म्हटलं जाई. या वर्गातल्या सरांसमोरच्या पहिल्या बाकावर तिघ बसली होती. त्यातला एकजण वर्गातल्या कोपऱ्यात असलेलं कोळ्याच जाळ पाहत बसला होता. जाळं पाहताना त्याचं तोंड नकळत उघडलं होतं. त्या बाकावरील उरलेली दोघ सरांकडं पाहून एकमेकांच्या कानात काहीतरी बोलून तोंड दाबून हसू आवरत होती. मग मधल्यानं कोळ्याच्या जाळ्याकडं बघत बसलेल्याकडं पाहिलं. आणि त्याच्या उघडलेल्या तोंडात पेन्सिल टाकली. तशी ती दोघ पुन्हा तोंड दाबून हसू रोखू लागली. कोळीजाळंबघ्या मुलानं रागानं आणि प्रतिक्षिप्त क्रियेत झटकल्यासारखी पेन्सिल तोंडातून फेकून दिली ती सरांच्या बाजूला जाऊन पडली. किंचित आवाज झाला. सरांनी डोळे उघडल्यासारखे करून पुन्हा झाकले. मग मधल्याने जाळंबघ्या मित्राच्या खांद्यावर हात टाकून त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या कानात हसू दाबत काहीतरी सांगितलं. तसा तो जाळीबघ्या हसू दाबण्याचा नादात जोरातच हसला. मग बाजूचे दोघेपण हसले. मग सगळा वर्ग हसला. दरम्यान सर दचकून जागे झाले. तपासाअंती बाजूच्या बाकवरील मुलींची साक्ष विचारात घेऊन सरांनी पुढच्या बाकावरील तिघांना दातओठ खात पाचपाच छड्या दिल्या. आयायायाया हा शब्द वेगवेगळ्या प्रकारात तिघांनी ओरडत हात झटकला.

२. लेंगावाला - शेळीवाला.

मुलांच्या हसण्याचा आवाज ऐकून वर्गाच्या खिडकीवर बसलेली साळुंखी उडून गुलमोहराच्या झाडावर जाऊन बसली. झाड शाळेमागच्या मारुतीच्या देवळाजवळ होतं. झाडाखाली दुपारपासून पांढरा लेंगा सदरा घातलेला माणूस अस्ताव्यस्त पडला होता. कपडे मातीत लोळल्यान मळले होते. बाजूला सायकल पडली होती. सायकलला अडकवलेली पोत्याची पिशवी खाली पडली होती, मोकळीक होती. गावातच बनवून घेतलेली जाड लेदरची चप्पल एका पायातून पडली होती, दुसऱ्या पायात अर्धी अडकली होती. त्याचा तोंडावर माशा बसत होत्या. चरायला नेलेल्या शेळ्या माघारी घेऊन येणारा दुसरा माणूस गुलमोहराजवळ आला. त्यानं डोक्यावर फाटक कापड कसतरी गुंडाळल होतं. दोन्ही हाताचे कोपर मागे घेऊन त्यात लांब काठी अडकवली होती. अंगात जुना मळका सदरा होता आणि काळी जुनी, फडायला काढलेली आपरी पॅन्ट होती. पायात जाड गावातच बनवून घेतलेल्या वहाणा होत्या. ओठांखाली तंबाखू चघळत खुरटी वाढलेली दाढी खाजवत तो शेळीवला त्या पसरलेल्या लेंगावाल्याजवळ आला. हातातली काठी त्या पसरलेल्या लेंगावाल्याच्या पाठीवर हलकेच आपटत तो तंबाखूची पिंक टाकत ओरडला ," आरं उट की लका, दिस मावळाय आला की....आयला शेरड रानात न्हेताना जी उताणा पडलाय...आजून सूद नाय आली वय तुला.....ए" असं म्हणून तो जोरात ओरडला आणि शाळा सुटल्याची घंटा झाली. पोरांचा गलका ऐकू येऊ लागला. शेळीवाला तोंडातल्या तोंडात शिवी हसडून पुढं गेला. एक कोकरू त्या लेंगावाल्याजवळ येऊन त्याच्या मातीत पडलेल्या हाताचा वास घेऊ लागलं. मग लेंगावाला डोळे किलकिले करून पाहू लागला.

Thursday, 19 January 2017

लेटरबॉक्स

#letterbox

आज सकाळी ७ ला स्वारगेटवरून दादरला जाणाऱ्या शिवनेरीत बसलो. मला पुणे मुंबई प्रवास शिवनेरीत (विंडो सीट) करायला खुप आवडतो. आजपण विंडोसीट मिळाली. पुणे-मुंबई शिवनेरी विंडो सीट सकाळचा प्रवास !!! 😊
हेडफोन टाकून music player "shuffle मोड"वर ठेवला. पडदा बाजूला सारून त्या मोठया काचेतुन जागं होणारं पुणं पाहु लागलो. पुढं एका थांब्याजवळ बस थांबली. बाहेर फुटपाथवर एक letterbox दिसलं, in fact तो फुटपाथ त्या लेटरबॉक्सच्या बाजूनं बांधला होता. त्या लेटरबॉक्सनं मला एक गोष्ट सांगितली...



                                      " लेटरबॉक्स "

निवांत उठायचं म्हणुन ते गेला आठवडाभर अलार्म न लावता झोपत होते, पण तरीही त्यांना साडेपाचला जाग यायचीच. मग थोडावेळ कुस बदलण्यात घालवून ते उठायचेच. मग काहीतरी खुडबुड केल्यामुळं त्यांच्या "अगं ऐकलंस का" बारीक डोळ्यांनी त्यांच्याकडं पाहत जरा त्रासानेच म्हणायच्या ," अहो कायंय एवढ्या लवकर ? स्वतः झोपायचं नाय ... दुसऱ्यालपण झोपु द्यायचं नाय..." कधी नुसतं त्यांच्याकडं त्रासून पाहायच्या आणि तोंडात काहीतरी पुटपुटत पुन्हा झोपायच्या. गेला आठवडाभर हे चालु होतं.

आजपण ते साडेपाचला उठले. आवाज होणार नाही याची काळजी घेतली तरी दार उघडताना आवाज झालाच. "अगं ए" नी त्रासून पाहिलं आणि पुटपुटत पुन्हा झोपल्या. त्यांनी आवरलं. कानाला मफलर बांधला, हाफ स्वेटर घातला, पायात चपला घालुन ते बाहेर पडले. बाहेर थंडी वाजत होती, धुकं दाटलेलंच होतं. रस्ता मोकळाच होता. दोन्ही हात काखेत घालुन अंग चोरून ते रस्त्यावरून चालत स्टॅंडकडं निघाले.

गेल्याच आठवड्यात ते निवृत्त झाले होते. चार-पाच वर्षांपूर्वी त्यांच्या कार्यालयात computerisation झालं होतं. तेव्हा ते आणि त्यांच्याबर नोकरीला लागलेले त्यांचे समवयस्क सुरुवातीला खुपच चिंतेत असायचे. ज्यांना computer वापरता येत नाही त्यांना सक्तीची VRS घ्यावी लागणार अशा वावड्या उठल्या होत्या. नवीन आलेली मुलं मुली खुपंच सफाईन computer वापरायची. खटखट क्लिकक्लिक करायची. त्यांना आणि त्यांच्या समवयस्क मंडळींना या नव्या लोकांची ईर्षा वाटायची आणि कौतुकपण वाटायचं. नंतर सरसकट सगळ्यांनाच computer च प्रशिक्षण दिलं गेलं. VRS च्या वावड्या खोट्या असल्याचं समजल्यावर त्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता. त्यांच्यातली बरीच मंडळी निवांत झाली होती. गरजेपुरता computer काहींनी शिकला, तर  काही "आता एकदोन वर्षात retirement आलीय आता कशाला नुसती डोकेदुखी" म्हणुन आला दिवस ढकलत होती. नवी लोकंही त्यांना सांभाळून घेत होती.

ते मात्र computer शिकायच्या प्रयत्नात नेहमी असायचे. प्रशिक्षण त्यांनी मन लाऊन पूर्ण केलं होतं. नव्या लोकांइतका सफाईनं त्यांना computer नव्हता वापरता येत. पण ते प्रयत्न करायचे. नव्या लोकांकडं जाऊन जमत नाही ते शिकुन घ्यायचे. त्यांना सहानुभूती नको होती. Retirement च्या एक दीड वर्ष आधीपर्यंत ते चांगला computer वापरू लागले. computer शी जुळवून घेतलं होतं. त्यांचं मित्रमंडळ चहाला जमलं की "आपल्या वेळी असं होतं, आता खुप अवघड आहे" अशा चर्चा हमखास व्हायच्या. मग कधी त्यांच्या computerशी जुळवून घेण्याबद्दल इर्षायुक्त चेष्टावजा कौतुक व्हायचं.

निरोप समारंभाला ते कधी नाही ते सुट घालुन कार्यालयात आले होते. त्यांच्याबर आणखी दोघेजण निवृत्त होणार होते. सगळ्यांचा निरोप समारंभ एकत्रच घेतला होता. त्यावेळी ते जास्त बोलले नव्हते. मग त्यांच्या सेक्शनमध्ये त्यांनी सगळ्यांना छोटीशी ट्रीट दिली होती. तिथं त्यांचं सगळ्यांनी तोंडभरून कौतुक केलं. सेक्शनबाहेर जाण्याआधी त्यानी आपली जागा आणि computerकडं काही सेकंद पाहिलं. काहीतरी वाटलेलं त्यांनी डोळ्यात येऊ नाही. जाताना सेक्शनच्या शिपायाच्या हातात शंभरची नोट ठेऊन मागं न पाहता ते निघुन गेले होते.

Retirement नंतरचा हा आठवडा त्यांना खुप वाईट गेला होता. झोप नीट लागली नव्हती. चुकल्यासारखं वाटत होतं. सकाळी ऑफिसच्या सवयीप्रमाणं रोज जाग येत होती. मग ते उठुन चालत स्टॅंडकड जायचे. तिथं चहा घ्यायचे. पेपर आल्यावर पेपर घेऊन तिथंच चाळायचे आणि परत यायचे.

आज त्यांना जरा जास्तच अस्वस्थ वाटंत होतं. चहा पिऊन झाला होता. पेपर घेऊन येणाऱ्या बसची वाट पाहत ते उभे होते. डोक्यात उदासी दाटली होती. उगाच इकडंतिकडं पाहत ते उभे होते. त्यांचं लक्ष चहाच्या टपरीच्या पलीकडं असणाऱ्या लेटरबॉक्सकडं गेलं. फुटपाथवर रोवलेलं... नाही फुटपाथ त्याच्या बाजूनं बांधलेला. त्याच्या बाजूला झाडाची वाळलेली पानं पडली होती. त्याच्या डोक्यात विचार सुरू झाले. संदेशवहन आणि दळणवळण क्रांती होण्यापूर्वी या लाल डब्याला किती महत्व होतं. आपल्या माणसाला सुखदुःखाची बातमी कळवताना या लाल डब्याकडं किती विश्वासानं, किती आदरानं पाहिलं जायचं ! टेलिफोन आणि आता मोबाईल आल्यावर यांच्याकडं कुणी बघेनासं झालं. यालापण सक्तीच्या VRS ची भीती वाटली असेल का बरं? अजुन कुणी पत्रं पाठवत असेल का? अजुन हे लेटरबॉक्स काम करत असेल का?  का retire झालं असेल? retire झालं असलं तर याचं महत्व कमी होतं का? याच्याकडं कुणी पाहत तरी असेल का? याचं अस्तित्व कुणाला जाणवत असेल का? वापरात नाही म्हणुन कुणी याच्याकडं पाहतच नसेल काय? यांच्याकडंही उपकार केल्यासारख्या सहनभूतीनं लोकं पाहत असतील काय? पण या letterbox ला असल्या सहानुभूतीची गरज नाहीय. आणि आता काम नाही म्हणुन याला वाईट वाटायचं कारणंच काय? यान आयुष्यभर आपलं काम चोखपणे केलं असणार. अरे यांच्याकडं पाहुन तर असं वाटतंय याला आपल्या कर्तव्यपूर्तीचा अभिमान आहे.

कदाचित यामुळं तर फुटपाथ बांधताना याला उखडून काढलं नसावं? दूरसंचार क्रांती व्हायच्या आधी यानं खुप मोठं काम केलंय. हो, यानं स्वतःला बिचारं का समजावं बरं?

विचार करत करत ते त्या लेटरबॉक्सजवळ आले. त्या लेटरबॉक्सवरून त्यांनी हळुवार हात फिरवला. गालातल्या गालात हसले. कपाळावरच्या आठ्या गेल्या. पेपरवाल्याच्या हाकेने ते भानावर आले. मागे वळाले आणि पेपर घेऊन घराकडं निघाले.