Thursday, 19 January 2017

लेटरबॉक्स

#letterbox

आज सकाळी ७ ला स्वारगेटवरून दादरला जाणाऱ्या शिवनेरीत बसलो. मला पुणे मुंबई प्रवास शिवनेरीत (विंडो सीट) करायला खुप आवडतो. आजपण विंडोसीट मिळाली. पुणे-मुंबई शिवनेरी विंडो सीट सकाळचा प्रवास !!! 😊
हेडफोन टाकून music player "shuffle मोड"वर ठेवला. पडदा बाजूला सारून त्या मोठया काचेतुन जागं होणारं पुणं पाहु लागलो. पुढं एका थांब्याजवळ बस थांबली. बाहेर फुटपाथवर एक letterbox दिसलं, in fact तो फुटपाथ त्या लेटरबॉक्सच्या बाजूनं बांधला होता. त्या लेटरबॉक्सनं मला एक गोष्ट सांगितली...



                                      " लेटरबॉक्स "

निवांत उठायचं म्हणुन ते गेला आठवडाभर अलार्म न लावता झोपत होते, पण तरीही त्यांना साडेपाचला जाग यायचीच. मग थोडावेळ कुस बदलण्यात घालवून ते उठायचेच. मग काहीतरी खुडबुड केल्यामुळं त्यांच्या "अगं ऐकलंस का" बारीक डोळ्यांनी त्यांच्याकडं पाहत जरा त्रासानेच म्हणायच्या ," अहो कायंय एवढ्या लवकर ? स्वतः झोपायचं नाय ... दुसऱ्यालपण झोपु द्यायचं नाय..." कधी नुसतं त्यांच्याकडं त्रासून पाहायच्या आणि तोंडात काहीतरी पुटपुटत पुन्हा झोपायच्या. गेला आठवडाभर हे चालु होतं.

आजपण ते साडेपाचला उठले. आवाज होणार नाही याची काळजी घेतली तरी दार उघडताना आवाज झालाच. "अगं ए" नी त्रासून पाहिलं आणि पुटपुटत पुन्हा झोपल्या. त्यांनी आवरलं. कानाला मफलर बांधला, हाफ स्वेटर घातला, पायात चपला घालुन ते बाहेर पडले. बाहेर थंडी वाजत होती, धुकं दाटलेलंच होतं. रस्ता मोकळाच होता. दोन्ही हात काखेत घालुन अंग चोरून ते रस्त्यावरून चालत स्टॅंडकडं निघाले.

गेल्याच आठवड्यात ते निवृत्त झाले होते. चार-पाच वर्षांपूर्वी त्यांच्या कार्यालयात computerisation झालं होतं. तेव्हा ते आणि त्यांच्याबर नोकरीला लागलेले त्यांचे समवयस्क सुरुवातीला खुपच चिंतेत असायचे. ज्यांना computer वापरता येत नाही त्यांना सक्तीची VRS घ्यावी लागणार अशा वावड्या उठल्या होत्या. नवीन आलेली मुलं मुली खुपंच सफाईन computer वापरायची. खटखट क्लिकक्लिक करायची. त्यांना आणि त्यांच्या समवयस्क मंडळींना या नव्या लोकांची ईर्षा वाटायची आणि कौतुकपण वाटायचं. नंतर सरसकट सगळ्यांनाच computer च प्रशिक्षण दिलं गेलं. VRS च्या वावड्या खोट्या असल्याचं समजल्यावर त्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता. त्यांच्यातली बरीच मंडळी निवांत झाली होती. गरजेपुरता computer काहींनी शिकला, तर  काही "आता एकदोन वर्षात retirement आलीय आता कशाला नुसती डोकेदुखी" म्हणुन आला दिवस ढकलत होती. नवी लोकंही त्यांना सांभाळून घेत होती.

ते मात्र computer शिकायच्या प्रयत्नात नेहमी असायचे. प्रशिक्षण त्यांनी मन लाऊन पूर्ण केलं होतं. नव्या लोकांइतका सफाईनं त्यांना computer नव्हता वापरता येत. पण ते प्रयत्न करायचे. नव्या लोकांकडं जाऊन जमत नाही ते शिकुन घ्यायचे. त्यांना सहानुभूती नको होती. Retirement च्या एक दीड वर्ष आधीपर्यंत ते चांगला computer वापरू लागले. computer शी जुळवून घेतलं होतं. त्यांचं मित्रमंडळ चहाला जमलं की "आपल्या वेळी असं होतं, आता खुप अवघड आहे" अशा चर्चा हमखास व्हायच्या. मग कधी त्यांच्या computerशी जुळवून घेण्याबद्दल इर्षायुक्त चेष्टावजा कौतुक व्हायचं.

निरोप समारंभाला ते कधी नाही ते सुट घालुन कार्यालयात आले होते. त्यांच्याबर आणखी दोघेजण निवृत्त होणार होते. सगळ्यांचा निरोप समारंभ एकत्रच घेतला होता. त्यावेळी ते जास्त बोलले नव्हते. मग त्यांच्या सेक्शनमध्ये त्यांनी सगळ्यांना छोटीशी ट्रीट दिली होती. तिथं त्यांचं सगळ्यांनी तोंडभरून कौतुक केलं. सेक्शनबाहेर जाण्याआधी त्यानी आपली जागा आणि computerकडं काही सेकंद पाहिलं. काहीतरी वाटलेलं त्यांनी डोळ्यात येऊ नाही. जाताना सेक्शनच्या शिपायाच्या हातात शंभरची नोट ठेऊन मागं न पाहता ते निघुन गेले होते.

Retirement नंतरचा हा आठवडा त्यांना खुप वाईट गेला होता. झोप नीट लागली नव्हती. चुकल्यासारखं वाटत होतं. सकाळी ऑफिसच्या सवयीप्रमाणं रोज जाग येत होती. मग ते उठुन चालत स्टॅंडकड जायचे. तिथं चहा घ्यायचे. पेपर आल्यावर पेपर घेऊन तिथंच चाळायचे आणि परत यायचे.

आज त्यांना जरा जास्तच अस्वस्थ वाटंत होतं. चहा पिऊन झाला होता. पेपर घेऊन येणाऱ्या बसची वाट पाहत ते उभे होते. डोक्यात उदासी दाटली होती. उगाच इकडंतिकडं पाहत ते उभे होते. त्यांचं लक्ष चहाच्या टपरीच्या पलीकडं असणाऱ्या लेटरबॉक्सकडं गेलं. फुटपाथवर रोवलेलं... नाही फुटपाथ त्याच्या बाजूनं बांधलेला. त्याच्या बाजूला झाडाची वाळलेली पानं पडली होती. त्याच्या डोक्यात विचार सुरू झाले. संदेशवहन आणि दळणवळण क्रांती होण्यापूर्वी या लाल डब्याला किती महत्व होतं. आपल्या माणसाला सुखदुःखाची बातमी कळवताना या लाल डब्याकडं किती विश्वासानं, किती आदरानं पाहिलं जायचं ! टेलिफोन आणि आता मोबाईल आल्यावर यांच्याकडं कुणी बघेनासं झालं. यालापण सक्तीच्या VRS ची भीती वाटली असेल का बरं? अजुन कुणी पत्रं पाठवत असेल का? अजुन हे लेटरबॉक्स काम करत असेल का?  का retire झालं असेल? retire झालं असलं तर याचं महत्व कमी होतं का? याच्याकडं कुणी पाहत तरी असेल का? याचं अस्तित्व कुणाला जाणवत असेल का? वापरात नाही म्हणुन कुणी याच्याकडं पाहतच नसेल काय? यांच्याकडंही उपकार केल्यासारख्या सहनभूतीनं लोकं पाहत असतील काय? पण या letterbox ला असल्या सहानुभूतीची गरज नाहीय. आणि आता काम नाही म्हणुन याला वाईट वाटायचं कारणंच काय? यान आयुष्यभर आपलं काम चोखपणे केलं असणार. अरे यांच्याकडं पाहुन तर असं वाटतंय याला आपल्या कर्तव्यपूर्तीचा अभिमान आहे.

कदाचित यामुळं तर फुटपाथ बांधताना याला उखडून काढलं नसावं? दूरसंचार क्रांती व्हायच्या आधी यानं खुप मोठं काम केलंय. हो, यानं स्वतःला बिचारं का समजावं बरं?

विचार करत करत ते त्या लेटरबॉक्सजवळ आले. त्या लेटरबॉक्सवरून त्यांनी हळुवार हात फिरवला. गालातल्या गालात हसले. कपाळावरच्या आठ्या गेल्या. पेपरवाल्याच्या हाकेने ते भानावर आले. मागे वळाले आणि पेपर घेऊन घराकडं निघाले.

No comments:

Post a Comment